घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारील महिलेसह तिच्या अडीच वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घडली. आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे. गुरुवारी संध्याकाळी किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि अडीच वर्षांचा स्वराज येणारे यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये शितल आणि स्वराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर आणि येणारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियांनी केला आहे.
Discussion about this post