मुंबई : राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी, ढगाळ वातावरण, कधी उन्हाचा चटका तर कधी पहाटच्या थंडीचा गारवा नागरिकांना अनुभवास मिळत आहे. राज्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत अजून फारशी थंडी पडली नाही. परंतु आता थंडीचा जोर वाढणार आहे.
देशातील अनेक भागात परिस्थिती बदलली आहे. देशातील काही भागांत थंडी वाढली आहे. थंडीचा हा जोर आता महाराष्ट्रात असणार आहे. येत्या गुरुवारपासून राज्यात आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसह बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येणार आहे.
त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. राज्याच्या काही भागांत थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तसेच पुढील तीन दिवस किमान तापमानात घटीचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.
राज्यभरात सध्या कोरडे हवामान आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम असणार आहे.विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवणार आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले. गोंदियात १५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील तापमान १६.९ अंश सेल्सियस होते. मुंबईत २४ अंश सेल्सिअस तापमान होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे.