भुसावळ । बंगलोर शहरातील महालक्ष्मीपुरम भागातील घरात धाडसी दरोडा टाकून तब्बत साडे पाच किलो सोने व रोकड घेऊन जाणाऱ्या दरोडेखोराच्या रावेरमधून मुसक्या आवळल्या. भुसावळातील सतर्कत रेल्वे सुरक्षा बलाने एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसच्या डब्यातून त्याला अटक केली. उपेंद्र प्रदीप शाही (वय-३५, रा.पनाथूर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगलोर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत असे की आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना यांच्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एच. श्रीनिवास राव यांनी माहिती दिली की, महालक्ष्मीपुरम बंगलोर येथे संशयित उपेंद्र शाही व त्याच्या साथीदारांनी मोठा दरोडा टाका असून त्यातील मुख्य संशयित एलटीटी-गोरखपूर या गाडीने जात आहे.
ही गाडी गुरूवार, १६ रात्री ११ वाजता भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म 5 वर आली असता, आरपीएफ निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक के.आर.तरड, उपनिरीक्षक एन.के. सिंग, उपनिरीक्षक सुभाष राजपूत आणि कर्मचारी यांनी गाडीची तपासणी केली मात्र संशयीत गवसला नाही, यामुळे निरीक्षक मीना यांनी अधिकारी, कर्मचारी यांचे चार जणांचे पथक धावत्या गाडीत पाठविले. गाडीची तपासणी करीत असतांना संशयीत ए-1 या डब्यात बसलेला आरपीएफला दिसला. आरपीएफजवळ असलेल्या फोटो व संशयीत एकच असल्याची खात्री झाल्यावर गाडी रावेर स्थानकावर थांबल्यावर संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पथकातील उपनिरीक्षक के.आर.तरड, महेंद्र कुशवाह, के.एस.वसावे, विनोद कुमार आणि ए.ए.हंसराज वर्मा यांनी अन्य गाडीने संशयिताला भुसावळात आणले.