अमळनेर । जिल्ह्यामधील शहरांसह ग्रामीण भागात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच अमळनेरात अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लांबविला आहे. यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमळनेर बस स्टॅन्ड समोरील भागवत रोडवर सुरवातीला चोरट्यांनी पवार मोबाईल हे दुकान फोडून दुकानातील आठ ते दहा मोबाईल हँडसेट व सुमारे दहा हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर याच रांगेतील शिरोडे प्रोव्हिजन फोडून तेथून काही रोकड व किराणा साहित्य चोरले.
या चोरीच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी (ता. १६) रात्रीच्या सुमारास राजकमल फूट वेअरच्या वरच्या पत्र्याचे स्क्रू काढून दुकानातील चार ते पाच हजारांचे चप्पल व बूट लंपास केले.याबाबत दुकान मालक जयेश राजेंद्र राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यायाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच रस्त्यावरील इतरही काही दुकानांवर अशाच प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत.
बाजारपेठेतील अनेक मुख्य चौकांमध्ये लोकसहभागातून ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. तरीही चोरीच्या घटना अजूनही पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. स्थानिक पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिला नसल्याने चोऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.