काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या विनाशकारी भूकंपात अनेक इमारती कोसळल्या. ज्यामध्ये किमान 128 लोकांचा मृत्यू झाला. या भूकंपात शेकडो लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भूकंप झाला तेव्हा बहुतेक लोक आपल्या घरात होते. त्यामुळे भूकंप झाला तेव्हा त्यांना घराबाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि इमारतींच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले.भूकंपाचे हे धक्के इतके तीव्र होते की नेपाळपासून दिल्लीपर्यंत पृथ्वी हादरली.
भारतात भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक लोक घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 500 किमी अंतरावर पश्चिम जाजरकोटमध्ये 10 किमी खोलीवर होता. राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले.