जळगाव । शहरातील पिंप्राळा सेंट्रल बँक कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह सोने चांदीचे दागिने लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या काही तासानंतर चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत असे की, प्रशांत गणेश माहोरे यांच्या आजीचे गेल्या ३ ऑक्टोंबरला निधन झाले. त्यामुळे माहोरे कुटुंबिय आलेगाव (जि. अकोला) येथे गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील रोकड आणि सोने चांदीचे दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.५ ऑक्टोंबरला दुपारी जेव्हा श्री. माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले, त्यावेळी लहान भावाने त्यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत कळविले. मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर चौघा संशयतांनी घरफोडी केल्याचे उघड झाले.
त्यानुसार रामानंदनगर पोलिसांनी सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा, हुडको), अब्रार अमित खाटीक (वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांना अटक केली.
पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Discussion about this post