पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे असं मृत आरोपीचे नाव असून स्वत:च्या कपड्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.
कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहात होता. कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये पप्पूने टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या साहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब कामावर असणाऱ्या करागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने उतर सहकाऱ्यांना बोलावून घेत पप्पूला खाली उतरवले परंतु तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पप्पूवर मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने नियमीत औषधपचार सुरू होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र या विरोधात त्यांनी मुंबई खंडपीठात अपील केले होते याची सुनावणी अद्याप सुरू होती. तर कोपर्डी येथे मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून यामध्ये प्रमुख मागणी या अत्याचारांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी अशी ही मागणी करण्यात आली होती
Discussion about this post