जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच जळगावात पुन्हा तरुणाची हत्या करण्यात आलीय. मुलीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून ट्रक चालक तरुणाचा लाठ्याकाठ्यांने मारहाण करत खून केल्याची घटना उघडकीस आलीय. सागर रमेश पालवे असं मृत तरुणाचे नाव आहे. तर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर) नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एमआयडीसीतील नवीन गुरांचा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्ट येथे सागर रमेश पालवे हा दोन वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान ट्रान्सपोर्टवर असताना त्याच ठिकाणी चालक म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे व नीलेश रोहिदास गुळवे यांनी खोलीमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. यात सागरला गंभीर दुखापत झाली व ८ रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची आई नीलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील संशयितांची एमआयडीसी पोलिसांनी माहिती काढून ज्ञानेश्वरला मुक्ताईनगर येथून तर नीलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबुल केला. सागर पालवे हा पिंटू बोदडे याच्या मुलीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून हा खून करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात येऊन न्या. जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Discussion about this post