मुंबई : डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतही मतभेद निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, या भूमिकेमुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर उघडपणे नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहेत.
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला शरद पवार यांच्या पक्षातील एकही खासदार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे या पक्षातील खासदारांची बैठक घेऊन विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे. डिलिमिटेशन विधेयकाला विरोध असून इंडिया आघाडीसोबत राहण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेवरही या चर्चेत विचारविनिमय झाल्याचे समजते.
राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवार यांच्या भूमिकेवरून पक्षातील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माण-खटाव विधानसभा अध्यक्ष अभयसिंह जगताप यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षातील नाराजीची चर्चा अधिकच वाढली आहे.
दुसरीकडे, लक्ष्मण मारोतराव ईक्कर पाटील यांची सोशल मीडिया पोस्टही चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आपण सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलो असून, अजित पवार यांनी पक्षात फूट पाडल्यानंतरही शरद पवार यांची साथ सोडली नसल्याचे म्हटले आहे.
शरद पवार हे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना कधीही तिलांजली देणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र, सध्याच्या भूमिकेमुळे हा विश्वास धुळीस मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या निर्णयांचे समर्थन केले; मात्र पुरोगामी विचारांशी तडजोड सहन करणे शक्य नसल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
एकीकडे डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधकांमध्ये राजकीय चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षातही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post