मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. आज पार पडत असलेल्या जिल्हा बँकेच्या मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले.
मुक्ताईनगर मतदान केंद्रावर रक्षा खडसे यांच्या सोबत असलेल्या प्रोटोकॉलवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला. या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच रक्षा खडसे यांचे तीन ठिकाणी मतदान असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे मतदान केंद्रावर या मुद्द्यावरून चर्चा रंगली.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना रक्षा खडसे यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्यासोबत असलेला प्रोटोकॉल हा शासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात आला आहे. तो माझ्यासोबत असण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच तीन ठिकाणी मतदान असल्याचा आरोपही त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. विशेषतः मुक्ताईनगरमधील या घटनेमुळे जिल्हा बँक निवडणुकीसोबतच दोन्ही गटांमधील राजकीय संघर्षाचीही चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post