जळगाव । मुक्ताईनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समिती व संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी भरणारा नियमित आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मुक्ताईनगर येथील ‘जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा, वॉर्ड क्रमांक १’ येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. याच दिवशी शहरात साप्ताहिक आठवडी बाजार भरत असल्याने मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ मधील कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, आठवडी बाजार बंद राहणार असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित नगरपालिकेच्या प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच हा आठवडी बाजार सोयीस्कर अशा पुढील दिवशी भरविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.














Discussion about this post