राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत सादर करणार अभिजात संगीत, कथक, गझल आणि नाट्य संगीत
जळगाव : भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून ओळख निर्माण केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा यंदा रौप्यमहोत्सवी अर्थात २५ वा आविष्कार रंगणार आहे. येत्या ७ ते १० जानेवारी २०२७ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संगीत, नृत्य आणि विविध कलाविष्कारांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे मुख्य प्रायोजक असून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, सुहान्स केमिकल्स प्रा. लि. तसेच होस्टिंग ड्युटीच्या माध्यमातून चांदोरकर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांचेही सहकार्य लाभणार आहे. यंदाच्या महोत्सवासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविलेल्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
शास्त्रीय गायन आणि कथक नृत्याने प्रारंभ
७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर महोत्सवाला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात पुण्यात वास्तव्यास असलेल्या पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर लिलाधर चक्रदेव, तर तबल्यावर आशय कुलकर्णी साथसंगत करतील. दुसऱ्या सत्रात पंडिता शमाताई भाटे यांच्या शिष्यांचा ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर होईल. यामध्ये प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले सहभागी होणार आहेत.
गझल, ठुमरी आणि बनारस घराण्याच्या कथकचा आनंद
८ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात झी टीव्हीवरील हिंदी सारेगमप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी असलेले सहेजदीप सिंग गझल आणि ठुमरी गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर अमनदीप सिंग, तर दिलरुब्यावर अंशदीप सिंग साथ देतील. दुसऱ्या सत्रात बनारस येथील प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा यांचे कथक नृत्य सादर होईल. त्यांना पखावजाची साथ त्यांचे गुरू आणि पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा करतील. उदयशंकर मिश्रा तबला आणि पढंतची, तर ओम सहाई मिश्रा सारंगीची साथ देतील.
कुमार गंधर्व परंपरेतील गायनासह तबला-पखावज जुगलबंदी
९ जानेवारी रोजी मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या उपसंचालक पदी कार्यरत असलेल्या पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन हे पहिल्या सत्राचे आकर्षण असेल. पं. कुमार गंधर्व यांच्या संगीत परंपरेतील भारती राजपूत या कुमारजींच्या अनवट बंदिशी आणि निर्गुणी भजने सादर करतील. त्यांना तबल्यावर निशांत शर्मा आणि संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ देतील. दुसऱ्या सत्रात पुण्याचे पं. संदीप रानडे शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत सादर करतील. तिसऱ्या सत्रात पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखावज जुगलबंदी रंगणार असून, पं. अजय जोगळेकर संवादिनीवर साथ करतील.
नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवुड घराना’
१० जानेवारी रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी पहिल्या सत्रात स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली नाट्यसंगीत आणि अभंगवाणी सादर करतील. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर निरूपण करतील. नव्या पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी आणि संगीतविश्वाची ओळख व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून विशेषतः जेन-झी पिढीसाठी अभिजीत पोहनकर आणि सहकारी ‘बॉलीवुड घराना’ हा सुश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होईल.
या चारही दिवसांच्या महोत्सवाचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. नव्या पिढीने आवर्जून ऐकावा आणि ज्येष्ठ रसिकांनीही अनुभवावा, असा हा स्वरसोहळा असल्याने जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि प्रायोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम निर्धारित वेळेत सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहनही प्रतिष्ठानने केले आहे. प्रवेशिकांसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२३०७७२७७ / २२२७७२२ वर अथवा
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्चजवळ, जळगाव या पत्त्यावर संपर्क साधला असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.















Discussion about this post