जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. आर. एस. माळी यांच्या निधनानंतर त्यांना खानदेशवासीयांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मूळचे रावेर तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. माळी यांनी पुणे विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शैक्षणिक कारकीर्द घडविली. त्यानंतर त्यांनी तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली. कुलगुरू म्हणून कार्यरत असताना त्यांनी खानदेशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. ‘नॅक’च्या अपेक्षांनुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक विद्यार्थी व शिक्षकाभिमुख करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कुलगुरूपदावरून निवृत्त झाल्यानंतरही उच्च शिक्षण क्षेत्राशी असलेले त्यांचे नाते कायम राहिले. उच्च शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या शासकीय समित्यांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधार व संवर्धन समितीचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. शैक्षणिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी खानदेश आणि खानदेशवासीयांशी असलेली आपुलकीची नाळ कायम जपली.
त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मु. जे. महाविद्यालय, जळगाव येथील मुख्य इमारतीतील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही श्रद्धांजली सभा होणार आहे.
या सभेला प्रा. डॉ. माळी यांच्यावर प्रेम करणारे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, प्राचार्य, संस्थाचालक, पत्रकार तसेच नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहून खानदेशच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन स्व. माळी सरांचे विद्यार्थी व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी
प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, जळगाव मोबाईल क्रमांक ९४२२२ ८३७४६ यावर संपर्क साधावा.















Discussion about this post