जळगाव । रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात शेतकरी महिलेच्या शेतातील शेतीउपयोगी साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. मध्यरात्री १० ते १२ अज्ञात चोरट्यांनी शेतातून ट्रॅक्टर-ट्रॉली, रोटाव्हेटर, स्प्रिंकलर संच, पीव्हीसी पाईप, विद्युत मोटार आणि गव्हाचे बियाणे असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली चोरीची घटना
जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या कल्याणी संजय सापकाळे (वय ४५) यांची सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोडलगत गट क्रमांक २६३ मध्ये शेती आहे. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १२ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश केला. शेतात ठेवलेले शेतीचे साहित्य चोरून नेले.
चोरट्यांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा जुना वापरता ट्रॅक्टर व ट्रॉली, १५ हजार रुपयांचा रोटाव्हेटर, १० हजार रुपयांचा स्प्रिंकलर संच, १० हजार रुपयांचे पीव्हीसी पाईप, १० हजार रुपयांचे गव्हाचे बियाणे आणि ५ हजार रुपये किमतीची पाणी उपसण्याची विद्युत मोटार असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
तालुका पोलिसांकडून तपास सुरू
शेतातील साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कल्याणी सापकाळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून १० ते १२ अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ११५ (२), ३५१ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी आवश्यक साहित्य चोरीला गेल्याने शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.














Discussion about this post