पश्चिम बंगाल : भाजपशासित राज्यांमध्ये शहरं आणि गावांची नावे बदलण्याच्या मुद्द्यावरून यापूर्वी अनेकदा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. आता थेट एका राज्याचेच नाव बदलण्याची तयारी सुरू असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ६ तारखेला विधानसभेत राज्याचे नाव बदलण्यासंदर्भातील ठराव मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विहित प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव भाजपकडून यापूर्वीही मांडण्यात आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी राज्याचे नाव ‘पश्चिम बंगा’ करण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले जाईल, असे म्हटले होते. राज्याचे नाव त्याच्या इतिहासाशी जोडण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जात असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वाराणसी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘पश्चिम बंगाल भवन’ बाबतही मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. बंगालमधून वाराणसीला येणाऱ्या पर्यटक आणि तीर्थयात्रेकरूंसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
गोहत्येच्या मुद्द्यावरही मोठी घोषणा
पत्रकार परिषदेत राज्यातील गोहत्येच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी भाष्य केले. राज्यात गोहत्या करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. काही ठिकाणी अशा घटना छुप्या पद्धतीने सुरू असल्याचा दावा करत सरकार त्याविरोधात कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सत्तेत आल्यापासून ‘कॅटल ॲक्ट, १९५०’ लागू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या विषयावर उच्च न्यायालयाचा आदेशही अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वृद्ध गाईंची काळजी घेणाऱ्या संस्थांना १ लाख रुपयांपर्यंत सरकारी अनुदान देण्याची योजना सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. कत्तलखाने हा स्वतंत्र विषय असला तरी गाईंची अशा प्रकारे कत्तल होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.














Discussion about this post