१५ नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे भव्य सोहळ्याचे आयोजन
जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक प्रगती तसेच आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (जी. एस. ग्राऊंड), जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य प्रभातफेरीने होणार आहे. या प्रभातफेरीत पारंपरिक आदिवासी वाद्यांचा गजर आणि विविध घोषणांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा तसेच क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे.
या सोहळ्यात शासनाच्या विविध वैयक्तिक व सामूहिक कल्याणकारी योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेसह विविध योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती, पारंपरिक कला, सामाजिक अस्मिता आणि विकासाचा जागर करणारा हा सोहळा असून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधव, भगिनी, विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.














Discussion about this post