बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एक्झिम बँकेने (Export-Import Bank of India) मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १२० रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना ११ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण १२० पदांची भरती
एक्झिम बँकेच्या भरती अधिसूचनेनुसार, एकूण १२० पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ९० पदांचा, तर मॅनेजरच्या ३० पदांचा समावेश आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी अथवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार आवश्यक असलेली सविस्तर शैक्षणिक पात्रता भरतीच्या अधिकृत अधिसूचनेत तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि सवलत
उमेदवारांचे वय १ नोव्हेंबर २०२६ रोजी मोजले जाणार आहे. त्यानुसार उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे, तर कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत मिळणार आहे.
किती मिळणार पगार?
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन मिळणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी दरमहा ४८ हजार ४८० ते ८५ हजार ९२० रुपये वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. तर मॅनेजर पदासाठी दरमहा ६४ हजार ८२० ते ९३ हजार ९६० रुपये वेतनश्रेणी असणार आहे.
अर्ज शुल्क किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज कधी आणि कसा करायचा?
एक्झिम बँकेच्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ११ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जासंबंधीच्या अटी तपासाव्यात.















Discussion about this post