मुंबई । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे विधान केले आहे. काही महिन्यांपूर्वी ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित करून चर्चेत आलेल्या जरांगे यांनी आता आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत दिले आहेत. या नव्या क्लिपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी येडशी येथे जाऊन जळीत घटनेत मृत्यू झालेल्या करंडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी आगामी काळात आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत दिले.
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा!
यापूर्वी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा अद्याप योग्य प्रकारे तपास झालेला नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या प्रकरणात आपल्याला अद्याप कोणत्याही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. आधीच्या ऑडिओ क्लिपचा सखोल तपास करून त्यामागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली. भाजपने एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप का केले आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता, याचाही खुलासा झाला पाहिजे, असे जरांगे म्हणाले. संबंधित प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. या चर्चा भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी सुरू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. पक्षांतर्गत काही नेत्यांकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी सुरू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ५०० कोटींच्या कथित आरोपानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचेही त्यांनी सूचित केले.
नव्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एका क्लिपचे संकेत दिल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. ही नवीन ऑडिओ क्लिप नेमकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे, त्यात कोणाचे संभाषण आहे आणि त्यातून कोणते खुलासे होणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील ही क्लिप कधी आणि कोणत्या स्वरूपात समोर आणतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post