मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रखडलेल्या या प्रक्रियेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अजितदादा हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेला दुजोरा देणारे विधान केले. अजित पवार यांनी स्वतः या प्रक्रियेबाबत चर्चा पुढे नेली होती, असे त्यांनी सांगितले.
१२ फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होते?
सुनील तटकरे यांच्या विधानानंतर शशिकांत शिंदे यांनीही या विषयावर भूमिका मांडली. अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती. अजितदादांच्या बारामतीतील बैठकीपूर्वी जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही यासंदर्भात बैठक झाली होती, असे शिंदे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी होणार होते. मात्र, महानगरपालिका निवडणुकांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. अजितदादा हयात असते, तर दोन्ही पक्ष एकत्र आले असते आणि राज्याच्या राजकारणाचे चित्र वेगळे दिसले असते, असेही त्यांनी नमूद केले.
पुढील राजकीय भूमिका काय असणार?
दरम्यान, दोन्ही पक्षांमधील विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाल्याने भविष्यात कोणती राजकीय समीकरणे तयार होणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे नेतृत्व याबाबत कोणता अधिकृत निर्णय घेते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नेत्यांच्या विधानांनंतरही प्रत्यक्ष विलिनीकरणाबाबतचा निर्णय आणि त्याची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.















Discussion about this post