जळगाव । जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये अवैध वाळू वाहतुकीचे पाच गुन्हे दाखल करून सात आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळूसाठा असा एकूण ५० लाख ९० हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात वाळू चोरी आणि अवैध उत्खननाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पथके तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी नजर ठेवून ही कारवाई केली.
भडगावमध्ये सर्वाधिक मुद्देमाल जप्त
भडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने वलवाडी बुद्रुक येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी १२ ब्रास वाळू आणि दोन डंपर असा एकूण ४१ लाख ३१ हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या संपूर्ण मोहिमेतील ही सर्वाधिक किमतीची जप्ती ठरली आहे.
नशिराबादमध्ये डंपरसह वाळू जप्त
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने तरसोद फाट्याजवळील महामार्ग पुलावर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २९४/२०२६ दाखल करण्यात आला असून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ३ ब्रास वाळू आणि एक डंपर, असा ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जळगाव तालुक्यात सलग तीन कारवाया
जळगाव तालुका पोलिसांनी फुफनगरी परिसरातील नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर सलग तीन कारवाया केल्या. खेडी खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक जागेत केलेल्या पहिल्या कारवाईत एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एक ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर, असा २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत तीन ते चार घमेले वाळू आणि एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. या प्रकरणातही एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली.
तर तिसऱ्या कारवाईत फुफनगरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी एक ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर, असा २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पाचही कारवायांमध्ये सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, वाळू चोरी आणि बेकायदा वाहतुकीविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.















Discussion about this post