जळगाव । दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या काळात गाड्यांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरदरम्यान विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार असून नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई ते हटिया दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या सेवेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि झारखंडकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
मुंबई-नागपूर विशेष रेल्वेच्या आठ फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरदरम्यान धावणारी द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गाडी क्रमांक ०१०८९ ही ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९.४५ वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता ही गाडी नागपूरला पोहोचेल. या मार्गावर गाडीच्या एकूण चार फेऱ्या नियोजित आहेत.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०९० नागपूर येथून ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी आणि सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीच्या मार्गावरही चार फेऱ्या होणार असल्याने या विशेष रेल्वेच्या एकूण आठ फेऱ्या पूर्ण होतील.
जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबा
या विशेष एक्स्प्रेसला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना नागपूरकडे जाण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नागपूर आणि विदर्भातील इतर भागांत जाणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे.
हटिया विशेष रेल्वेच्या सेवेत वाढ
दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ऑक्टोबरअखेरपर्यंत निश्चित करण्यात आलेली ही सेवा आता नोव्हेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे.
गाडी क्रमांक ०८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०८६०९ हटिया येथून २ ते ३० नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी सुटणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी पाच अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे झारखंडच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.















Discussion about this post