जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला. या निर्णयानंतर सुमित पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दरवाजावर लाथा मारल्या तसेच हाताने दरवाजा ठोकून आपला रोष व्यक्त केला. माझा अर्ज राजकीय दबावातून आणि अदृश्य शक्तींच्या माध्यमातून बाद करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या प्रकारामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे.
सुमित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी ९ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. मात्र, उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या निर्णयाची प्रत देण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही आपला अर्ज बाद करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असून संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‘दबाव आणणाऱ्यांना उघडे पाडणार’
आपला उमेदवारी अर्ज बाद करण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करत सुमित पाटील यांनी या प्रकरणात अदृश्य शक्तींचा हात असल्याचे म्हटले. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्यांची नावे लवकरच समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच या प्रकरणाला शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेदही या निमित्ताने समोर येत असल्याची चर्चा आहे.
सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे सतीश शिंदे यांनी हरकत घेतली होती. लेखापरीक्षण, संचालक पदाचा कार्यकाळ यासह निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता निकषांच्या आधारे ही हरकत नोंदविण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रियेत सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे या निर्णयावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
‘नियमानुसारच अर्ज बाद’; सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर जळगावचे सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीतील नियम आणि पात्रतेच्या निकषांनुसारच बाद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्जावर दाखल झालेली हरकत आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर नियमानुसार निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
एकीकडे सुमित पाटील यांनी राजकीय दबावाचा आरोप करत न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे निवडणूक प्रशासनाने नियमांनुसारच कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील हा वाद आता न्यायालयीन पातळीवर जाण्याची शक्यता असून, आगामी काळात या प्रकरणात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post