मुंबई । दिवाळीचा सण जवळ आलेला असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या लाखो प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
संघटनेने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार, ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद करून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात भव्य द्वारसभा आणि निदर्शने आयोजित केली जाणार आहेत. तर ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपये सणउचल तातडीने देण्यात यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. यासोबतच २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा करावी, तसेच २०१८ पासूनचा महागाई भत्त्याचा संपूर्ण फरक द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात यावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी आणि निवडश्रेणी व श्रेणीकरणासंदर्भातील परिपत्रक रद्द करावे, अशाही मागण्या संघटनेने केल्या आहेत.
याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्त्याची थकबाकी तातडीने देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दिवाळीत एसटीची चाके थांबणार?
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चाकरमानी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. अशा परिस्थितीत ५ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाल्यास एसटीच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बस फेऱ्या विस्कळीत झाल्यास ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर महामंडळ आणि राज्य सरकार काय तोडगा काढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post