यावल । यावल शहरात एका संशयास्पद आणि अत्यंत धक्कादायक घटनेत पतीनेच आपल्या तरुण पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यावल शहरातील आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगर येथे ही थरारक घटना घडली असून, यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, फरदीन खान आरिफ खान (वय २१) आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे दोघे तिरुपती नगरातील घरात वास्तव्यास होते. सोमवारी घरातील इतर सदस्य एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. यादरम्यान पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद झाला. या वादातून संतापलेल्या आरोपी फरदीनने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. या अमानुष मारहाणीत मशीराबी यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी जेरबंद आणि गुन्ह्याची कबुली
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेनंतर फरार होऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी फरदीनला पोलिसांनी अवघ्या काही तासांत साकळी गावाजवळ शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. विशेष म्हणजे, या तरुण दाम्पत्याचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वीच झाला होता. संशयाच्या एका क्षुल्लक कारणावरून संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post