जळगाव । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे. बहिणीच्या पतीसोबत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने सनी विनोद डोळे (वय २७, रा. शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सुमारे एक वाजता ही घटना घडली. या प्रकरणातील संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या या वादाचे पुढे गंभीर स्वरूप धारण केले. याचदरम्यान संशयित सुरजने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर सनीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सनीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post