जळगाव । जळगावच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत कुंभमेळ्याच्या कामकाजावरून गंभीर आरोप केले आहेत. मंत्री महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत, असा हल्लाबोल करत महाजन हे जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्तेचे फायदे उपभोगण्यात व्यस्त असल्याचा दावा दानवे यांनी केला. जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
कुंभमेळ्याच्या कामावरून महाजनांना लक्ष्य
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना दानवे यांनी कुंभमेळ्याच्या कामकाजावरून आरोप केले. महाजन यांचे नातेवाईक कथित बोगस ऑर्डर प्रकरणात अडकल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, महाजन यांना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे गांभीर्य नसल्याचे सांगत ते जिल्ह्यापेक्षा मुंबईत अधिक वेळ घालवत असल्याची टीका केली.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याऐवजी सत्तेचा लाभ घेण्यातच काही नेते गुंतले असल्याचा आरोप दानवे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगावमधील राजकीय वातावरणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरूनही प्रश्न
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेत आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिपवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. या कथित व्यवहारात पैसे कोणी दिले, ते कसे दिले आणि त्यामागे कोण आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणाशी संबंधित महिलेची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. यासोबतच, या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कथित ऑडिओ क्लिपमधील दावे आणि पैशांच्या व्यवहाराबाबत सत्य समोर आणण्यासाठी तपासाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.















Discussion about this post