मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी क्लिपच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून त्यांना प्रत्युत्तर दिले. क्लिपची तारीख कदम यांना आधीच कशी समजली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
रामदास कदमांना क्लिपची तारीख आधीच कशी समजली?
मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, त्यापूर्वीच रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऑडिओ क्लिपच्या तारखेबाबत माहिती दिली होती. ही माहिती त्यांना आधीच कशी मिळाली, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला.
“ऑडिओ क्लिपची तारीख आणि वेळ तुम्हाला कशी माहिती झाली?” असा सवाल करत या प्रकरणामागील सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘ऑडिओ क्लिप खरी आहे, चौकशी करून सत्य बाहेर आणा’
आपण समोर आणलेली ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. क्लिपची सत्यता तपासून संपूर्ण प्रकरण जनतेसमोर आणावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणात संबंधित राजकीय नेत्यांची नावे आली आहेत म्हणून चौकशी टाळली जाऊ नये, असे जरांगे म्हणाले. सत्य बाहेर न आल्यास जनतेच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. “हा गंभीर विषय आहे. माझ्याविरोधात मोठा कट रचण्यात आला आहे,” असा आरोप करत जरांगे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. चौकशी झाली नाही, तर या प्रकरणाबाबत वेगळा समज निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
फॉरेन्सिक चौकशीची मागणी; राजकीय वर्तुळाचे लक्ष
ऑडिओ क्लिपची सत्यता, तिची तारीख आणि ती सार्वजनिक कशी झाली, या मुद्द्यांवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे जरांगे यांनी क्लिप खरी असल्याचा दावा केला आहे. आता या प्रकरणात अधिकृत चौकशी होते का, क्लिपच्या सत्यतेबाबत काय निष्कर्ष समोर येतात आणि संबंधित नेत्यांकडून पुढे काय प्रतिक्रिया दिल्या जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post