जळगाव | जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना, जलसंधारण तसेच चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.
व्ही. बी. जी. रामजी योजनेंतर्गत शेल्फवरील ७२ हजार कामे सुरू करण्यात येत असून, या कामांमधून ९४ लाख मनुष्यदिवस रोजगारनिर्मितीची क्षमता उपलब्ध होणार आहे. तसेच, पूर्वीच्या मनरेगा योजनेंतर्गत अपूर्ण असलेली ४८ हजार कामेही सुरू ठेवण्यात येणार आहेत. या कामांमधून ८६ लाख मनुष्यदिवस रोजगारनिर्मितीची क्षमता उपलब्ध होणार आहे. याशिवाय, भविष्यातील कामांचे नियोजन करण्यासाठी युक्तधारा पोर्टलवर ८० हजार कामे अपलोड करण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे यांनी दिली.
मजुरांना कामाची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पडेस्क
मजुरांना कामाची मागणी सहजपणे नोंदविता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालय स्तरावर हेल्पडेस्क सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचे दूरध्वनी क्रमांक आणि तालुकास्तरावरील संबंधित तहसील कार्यालयांचे संपर्क क्रमांक गावोगावी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मजुरांना या क्रमांकांवर संपर्क साधून कामाची मागणी नोंदविता येईल. दूरध्वनीद्वारे प्राप्त मागण्यांची नोंद घेऊन संबंधित यंत्रणांमार्फत रोजगार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, रोहयो शाखेचे कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कामाच्या मागणीची नोंदणी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कामाची मागणी नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक -०२५७-२२१७१९३ / ०२५७-२२२३१८०
दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, जलसंधारणाच्या कामांना चालना देणे आणि भविष्यातील पाणी व चारा उपलब्धतेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे. मजुरांनी वरील संपर्क क्रमांकांद्वारे कामाची मागणी नोंदवून रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post