जळगाव । हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. दीपेश कमलेश रुपानी असे या संशयिताचे नाव असून, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा रेल्वे स्थानकावर त्याला पकडले. पोलिसांना ओळखता येऊ नये म्हणून त्याने टक्कल करून वेषांतर केले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच धावत्या दुरंतो एक्स्प्रेसमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुपानीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
दीपेश रुपानी हा जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातील सुमन रेसिडेन्सी येथे राहत होता. हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याने शहरातील अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांकडून मोठी रक्कम स्वीकारून तब्बल १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी रुपानीने विविध ठिकाणी वास्तव्य बदलल्याची माहिती तपासात समोर आली. राजस्थान, जोधपूर, नागपूर आणि खामगाव अशा ठिकाणी तो फिरत होता. पोलिसांना आपला माग काढता येऊ नये म्हणून त्याने बनावट सिमकार्डचा वापर केला. तसेच ओळख लपवण्यासाठी टक्कल करून नेहमीचा पेहरावही बदलला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे आर्थिक गुन्हे शाखेसमोर आव्हान बनले होते.
आरोपी गोव्यात असल्याची गोपनीय माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तपासाला वेग आला. शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी दीपेश हा सीएसएमटी-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पथक भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचले. दुरंतो एक्स्प्रेसचा भुसावळ येथे अवघ्या पाच मिनिटांचा थांबा असल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ आणि पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील यांनी तत्काळ गाडीत चढून संशयिताचा शोध सुरू केला.दुरंतो एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्थानकावर संथ होत असताना पोलिसांची चाहूल दीपेशला लागली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने धावत्या गाडीतून फलाटावर उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील, समाधान पाटील, घनशाम पवार आणि विजय शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
गुंतवणुकीच्या आमिषाने झालेल्या या मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून फसवणुकीचे इतर तपशील समोर येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post