मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जात असताना, दुसरीकडे राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या सात कल्याणकारी योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही योजना बंद करण्यात आल्या असून, काही योजनांचे स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खर्चात घट, निधीची मागणी नसणे आणि लाभार्थ्यांकडून अपुरा प्रतिसाद ही या निर्णयामागील प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
या निर्णयामुळे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे जुने स्वरूप, महिला मंडळांना दिले जाणारे अनुदान आणि इतर काही कल्याणकारी योजनांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद करण्यात आलेली नसून, ती सुरूच आहे.
महिला-बालविकास विभागाच्या कोणत्या ७ योजनांना कात्री?
१. माझी कन्या भाग्यश्री योजना – जुन्या योजनेचे स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष रद्द करण्याची प्रक्रिया सुरू.
२. महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे – खर्चात घट झाल्याच्या कारणास्तव १६ ऑक्टोबरपासून बंद.
३. महिला मंडळांना अनुदान – निधीची मागणी आणि प्रतिसाद कमी असल्याने योजना बंद करण्याचा निर्णय.
४. देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य – निधीची मागणी नसल्यामुळे योजना बंद करण्याचा निर्णय.
५. वीज नसलेल्या अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जा संच – ही योजना बंद करण्यात आली आहे.
६. निवारागृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना साह्य – योजनेच्या पुढील अंमलबजावणीबाबत आर्थिक लेखाशीर्ष रद्द करण्याची प्रक्रिया.
७. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आर्थिक मदत – या योजनेच्या स्वतंत्र आर्थिक तरतुदीबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
महिला व बालविकास विभागाकडून काही महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काहींचे अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे ही योजना खर्च घटत असल्याच्या कारणास्तव १६ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा परिषदांमार्फत महिला मंडळांना अनुदान देण्याची योजना आणि देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य करणारी योजना, या दोन्ही योजनांना कडून निधीची कोणतीही मागणी किंवा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, वीज नसलेल्या अंगणवाडी केंद्रांसाठी सौरऊर्जा संच पुरवण्याची योजना देखील बंद केली आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीजजोडणी उपलब्ध आहे, तिथे वीजखर्चासाठी केंद्र सरकारकडून दरमहा ५०० रुपयांची तरतूद असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. मात्र, कागदोपत्री अनुदानाची तरतूद असणे आणि प्रत्यक्षात प्रत्येक अंगणवाडीत वीज उपलब्ध असणे या दोन भिन्न गोष्टी असल्यामुळे, वीजजोडणी नसलेल्या अंगणवाड्यांसमोर निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या बाबतीत सुधारित स्वरूपात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जुनी योजना आधीच बंद करून १ एप्रिल २०२३ पासून तिच्या बदलात ‘लेक लाडकी’ योजना अमलात आणण्यात आली आहे. आता या जुन्या योजनेचे स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. असे असले तरी, ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते, त्यांची सर्व प्रलंबित देयके मार्च २०२७ अखेरपर्यंत अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२७-२८ पासून या जुन्या योजनेचे लेखाशीर्ष कायमचे रद्द केले जाणार आहे.














Discussion about this post