पारोळा । पारोळा तालुक्यातील पाचही मंडळात गेल्या महिन्याभरापासून पाऊस पडला नसून पावसाअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप काही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारच्या या उदासीन धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला.
पारोळा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असून १५ सप्टेंबरपर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास मतदार संघात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना देण्यात आले.
यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी जि. प. सदस्य रोहन पाटील, बाजार समिती संचालक रोहन मोरे, हिम्मत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, व्यापार व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील, तालुकाध्यक्ष संतोष महाजन, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे आदी पदाधिकारीसह शेतकरी उपस्थित होते.
कर्ज काढून काळ्या आईच्या कुशीत सोने पिकेल या आशेने शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस केला. मात्र ग्रामीण भागातील वाढती लोडशेडिंग व राज्य सरकारचे उदासीन धोरण यामुळे आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते कासोदा रस्त्या लागत असलेल्या प्रशासकीय तहसील कार्यालय इमारत पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर येत शासनाला जाग येण्यासाठी घोषणा दिल्या.
शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पिक जळत असतांना शासनाच्यावतीने कोणतीही मदत जाहीर होत नाही. उलट संपुर्ण तालुक्यात पाचही महसुल मंडळामध्ये शेतकरी पिक विम्यास पात्र असतांनाही शासनाकडून मदत मिळाली नाही. अशा विदारक परिस्थीतीत शेतक-यांच्या बांधावर जाऊन पिक परीस्थीतीचा आढावा घेतला पाहिजे. शासनाने त्वरीत सर्वच महसूल मंडळांना पिक पिम्या साठी पात्र ठरवून २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कंपन्याना द्या. संपुर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करुन सरसकट पंचनामे करुन शेतक-यांना राज्य आपत्ती निवारण निधीमधुन अर्थिक मदत करावी.; अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post