मुक्ताईनगर । महाराष्ट्रात कडक बंदी असतानाही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर मुक्ताईनगर पोलिसांनी दणका दिला आहे. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावर एका होंडा सिटी कारमधून तब्बल ३ लाख ९५ हजार ७४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बऱ्हाणपूर ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील ‘हॉटेल आरंभ’समोर पोलीस पथक गस्त घालत असताना एक संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तातडीने मज्जाव करत सोनरी रंगाच्या होंडा सिटी कारची (क्र. एमएच १६ आर ४५७५) कसून तपासणी केली. या तपासणीमध्ये कारच्या आत मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध साठा लपवून नेण्यात येत असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात विमल पानमसाल्याची पाकिटे आणि व्ही-१ बिग तंबाखूचा मोठा साठा सापडला. जप्त करण्यात आलेल्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांची बाजारातील किंमत १ लाख ८० हजार ७४० रुपये इतकी आहे. तस्करीसाठी वापरण्यात आलेली २ लाख १५ हजार रुपये किमतीची होंडा सिटी कार आणि प्रतिबंधित गुटख्याचा साठा असा एकूण ३ लाख ९५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची फिर्याद
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गजानन राजेंद्र पाटील (वय २६, रा. मेळसावंगी, ता. मुक्ताईनगर) आणि भारत उत्तम भोई (वय २३, रा. मेंढोळदे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील करीत आहेत.














Discussion about this post