नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज दिल्लीतील कनॉट प्लेस येथे तिरंगा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला विरोध करणाऱ्या व्यावसायिकांना सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मोर्चाच्या आयोजनासंदर्भातील याचिकेवर तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही.
सेंट्रल पार्क बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान
कॉक्रोच जनता पार्टीच्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली महानगरपालिकेने कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क बंद केले आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. मोर्चामुळे ग्राहकांची वर्दळ कमी होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते, असा दावा करत व्यावसायिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला. या प्रकरणात संबंधित सर्व घटकांमध्ये समन्वय निर्माण होईल, अशी आशाही न्यायालयाने व्यक्त केली.
आंदोलनाचा अधिकार आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा
सुनावणीदरम्यान वकील जय अनंत देहाद्राय यांनी आंदोलनामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, न्यायालयाने या टप्प्यावर कोणतेही तातडीचे निर्देश देण्यास नकार दिला.न्यायालयाने आंदोलनाचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी हे मुद्दे एकमेकांशी संबंधित असल्याचे निरीक्षण नोंदवले. सर्वांनी सुज्ञपणे वागून नागरिकांना होणारा त्रास टाळावा, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली.
व्यावसायिकांच्या याचिकेवर २६ किंवा २७ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीकडून आज संध्याकाळी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाकडे लक्ष लागले आहे.














Discussion about this post