दहावी उत्तीर्ण युवक-युवतींना प्रवेशाची संधी; प्रशिक्षणासाठी केवळ १०० रुपये शुल्क
जळगाव | ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे तसेच तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल आणि रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेता युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जामनेर येथील स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आधुनिक अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमांसाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे. सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह व्यावसायिकांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. शासनाने या प्रशिक्षणासाठी १०० रुपये शुल्क निश्चित केले असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
संस्थेत सध्या ‘सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ आणि ‘डिजिटल मित्र’ हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून, सौरऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेता येणार आहे.
या अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर येथे संपर्क साधावा. प्रवेशासंदर्भात किरण चव्हाण (९३२२५४१६५९) आणि व्यंकटेश माळी (९१५६८६७७३६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post