नंदुरबार । जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली असून, शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली आहे. शहादा तालुक्यातील कवठळ येथील प्रगतशील शेतकरी विनोद जाधव चौधरी यांनी पाण्याअभावी आपल्या शेतातील ऊस, पपई आणि केळीची पिके उद्ध्वस्त केली. आठ महिने मुलाप्रमाणे जपलेल्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवताना या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. पिकांसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेल्याने आता कर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
दोन बोअरवेल आटल्या, चार नव्या बोअरवेल खोदल्या; तरीही पाणी नाही!
विनोद जाधव चौधरी यांच्याकडे एकूण ६० एकर शेती आहे. यापैकी सहा एकर क्षेत्रात ऊस, १२ एकरांत पपई, आठ एकरांत केळी, तर ३० एकर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला शेतातील दोन बोअरवेलच्या मदतीने त्यांनी आठ महिने पिकांचे संगोपन केले. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही बोअरवेल आटल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले.पाण्याच्या शोधात त्यांनी तब्बल ६०० फूट खोल अशा चार नवीन बोअरवेल खोदल्या. यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. मात्र, एवढा खर्च करूनही एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही. डोळ्यांसमोर पिके करपत असल्याचे पाहून अखेर त्यांनी उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.
लाखोंचा खर्च वाया; कर्ज फेडायचे कसे?
ऊस, पपई आणि केळीच्या लागवडीसाठी त्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. सहा एकर उसासाठी आठ महिन्यांत सुमारे तीन लाख रुपये, १२ एकर पपईसाठी नऊ लाख रुपये, तर आठ एकर केळीसाठी सहा लाख रुपये खर्च करण्यात आले. अशा प्रकारे या तीन पिकांसाठी एकूण १८ लाख रुपयांचा खर्च झाला. कर्ज काढून आणि मोठ्या आशेने उभी केलेली पिके पाण्याअभावी नष्ट झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. आता कर्जाची परतफेड कशी करायची आणि पुढील शेती कशी करायची, या विवंचनेत ते आहेत.
‘अनुदान नको, मदत नको; फक्त बांधापर्यंत पाणी द्या!’
शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा अनुदान देण्यापेक्षा सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शासनाकडून कोणत्याही अनुदानाची अपेक्षा नसून, शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवावे, एवढीच मागणी त्यांनी केली आहे.सध्या मध्य प्रदेशातून तापी नदीत पाणी आले असून, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमध्येही पाणीसाठा करण्यात आला आहे. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नसल्याने सिंचनाचा प्रश्न कायम आहे. उपसा जलसिंचन योजनांना मान्यता आणि निधी मिळाल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात पाणी शेतापर्यंत पोहोचत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे ५१ टक्के तूट नोंदवण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्वात कमी पर्जन्यमान शहादा तालुक्यात झाल्याची माहिती आहे. पावसाने दिलेली दडी आणि भूजल पातळीत झालेली घट यामुळे शेतीसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. एका बाजूला पाण्याअभावी पिके उद्ध्वस्त होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तापी नदीत उपलब्ध असलेले पाणी शेतापर्यंत पोहोचत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासोबतच प्रशासकीय दिरंगाईचाही सामना करावा लागत आहे. पिके जगवण्यासाठी पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, शासन आणि प्रशासनाने तातडीने सिंचनाच्या प्रश्नावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.















Discussion about this post