जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात दोन वर्षांपासून शिक्षा भागात असलेल्या कैद्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. इतर बंदिवानांनी त्याचे पाय धरून ठेवत त्याला खाली उतरविल्याने अनर्थ टळला. अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे असं या कैद्याचे नाव असून या घटनेने कारागृहात एकच खळबळ उडाली.
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित अमोल सोनवणे २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हा कारागृहातील कोविड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. दरम्यान मंगळवारी रात्री कारागृहातील शिपाई विकास महाजन, संदीप थोरात हे ड्यूटीसाठी कारागृहात हजर झाले. २९ रोजी दुपारी एकच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्यूटीचा चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोविड बॅरेकमधील बंदिवानांची आरडाओरड चालू झाली.
यावेळी हजर असलेल्या शिपायांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी बॅरेकमधील बंदी अमोल ऊर्फ कार्तिक सोनवणे हा बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेताना दिसला. कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमध्ये इतर बंदिवानांना सोनवणे याचे पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून खाली उतरवीत त्याचा जीव वाचविला. यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.
Discussion about this post