जळगाव । मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीवरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या कुटुंबाविषयी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांना प्रत्युत्तर दिले, तर एकनाथ खडसे यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करत आमदारांना प्रतिआव्हान दिले. त्यामुळे मुक्ताईनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. आमदारांची मुलगी नगराध्यक्ष असूनही नगरपंचायतीत दिसत नसल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.“माझ्या मुलीविषयी का बोलताय? खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तुम्हालाही मुली आहेत, जरा भान ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी खडसेंना सुनावले. तसेच, कुटुंबाविषयी बोलल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दिला.
निखिल खडसेंच्या मृत्यूचा उल्लेख; पाटलांचा सवाल
आपल्या कुटुंबावर टीका होत असल्याच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंचे पुत्र निखिल खडसे यांच्या मृत्यूचा उल्लेख केला. “माझ्या घरात तुम्ही बोलता, मग तुमच्या मुलाने निखिलने आत्महत्या का केली? निखिल खडसेंनी काय पाहिलं की त्याला जीवन संपवावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.याशिवाय, एका मंत्र्याने आपण गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. या वक्तव्यांमुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांनी निखिल यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करावी, असे आव्हान त्यांनी दिले.त्याचबरोबर, नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत “नगराध्यक्ष कुठे आहेत, ते सांगा आणि ५०० रुपये बक्षीस मिळवा,” अशा शब्दांत खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. नगराध्यक्षांच्या कामकाजाबाबत त्यांनी केलेल्या टीकेमुळे हा वाद आणखी वाढला आहे.















Discussion about this post