जळगाव । जळगाव शहरात संभाव्य गँगवार घडवून आणत तिघांची हत्या आणि त्यानंतर सोन्याची लूट करण्याचा कथित कट पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीशी संबंधित पाच संशयित शार्प शूटर्सना अटक करण्यात आली आहे. भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेल्या बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी या हत्यांसाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून चार गावठी पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे, ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांना लक्ष्य करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात कार्यक्रमासाठी आलेल्या संबंधित व्यक्तींवर हल्ला करून त्यांची हत्या करायची आणि त्यांच्या अंगावरील सोने लुटायचे, असा कथित कट रचण्यात आला होता. यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी पाच लाख रुपये आगाऊ दिल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंप्राळ्यात मध्यरात्री पोलिसांचा सापळा
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पिंप्राळा परिसरात कारवाईचे नियोजन केले. भवानीमाता मंदिर ते सिल्क मिलजवळील मोकळ्या जागेत सापळा रचून इनोव्हा कारवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये खुशाल गजानन बोरसे (रा. खडक रोड, भुसावळ), संदीप बबन लोंढे (रा. वाघनगर, जळगाव), राजू ऊर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण ९ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या साहित्यामुळे नियोजित हल्ल्याच्या संशयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीत त्यांनी जळगाव तालुक्यातील उमाळा येथे एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत या खोलीची झडती घेतली. तेथे आणखी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आढळून आला.
या मुद्देमालाची किंमत दोन लाख २२ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पिंप्राळा आणि उमाळा येथील दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार गावठी पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे, एमडी ड्रग्ज आणि अन्य साहित्य असा १२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत.
या कथित कटाच्या सूत्रधारांमध्ये बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांची नावे समोर आली आहेत. हत्येच्या कटामागील नेमके कारण, सुपारीच्या व्यवहारातील इतर सहभागी, नियोजनाची व्याप्ती आणि संभाव्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी गंभीर
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींसह फरार संशयितांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी आणि शस्त्र कायद्यांतर्गत यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. बंटी पथरोड याच्याविरुद्ध १९, तर शिव पथरोड याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.















Discussion about this post