जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसात पेरण्या झाले. त्यांनतर पिके बहरू लागली असताना पावसाने दडी मारली असून यामुळे खरिपाची पिके धोक्यात आलीय. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच अशात सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करुन त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
याबाबत श्री. खडसेंच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटलेय की, यंदा सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यासह, खानदेशात व राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. प्रारंभी राज्यातील विशिष्ट भागात झालेल्या अतिवृष्टीखेरीज नंतरच्या दिवसांत पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली. पावसाच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. तुरळक सरींपलिकडे पाऊस होताना दिसत नाही.
खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये, तसेच थेट उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून विदर्भापर्यंत व मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झलेला नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. अर्ध्याहून अधिक प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी सुरु झालेले टँकर अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरुच असून, ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत व टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तविल्याने संपूर्ण राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
Discussion about this post