जळगाव । यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यांतील १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील १४५९६ विद्यार्थ्यांची मंगळवार, दि.२९ ऑगस्ट रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची गणित व इंग्रजी विषयाची गुणवत्ता चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांनी सूचना दिल्या आहेत.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची पहिली गुणवत्ता क्षमता चाचणी २९ ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेवर होत असून, गणित व इंग्रजी क्षमता चाचणी परीक्षेस इयत्ता ५ वी ते १० वी मधील शासकीय आश्रमशाळांचे २५२४ विद्यार्थी व अनुदानित आश्रमशाळांचे ११०७२ असे एकूण १४५९६ विद्यार्थी गुणवत्ता क्षमता चाचणी परीक्षा देणार आहेत.
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक शाळेवर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. भरारी पथकाची देखील नियुक्ती केलेली आहे. शाळेचे मुख्याध्यापकांना केंद्रसंचालक व शाळेतील एक शिक्षक यांची प्रश्नपत्रिका कस्टडीयन म्हणून नियुक्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणात्मक, विकास सातत्याने व्हावा यासाठी या परिक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली आहे.
Discussion about this post