पुणे : जुलैमध्ये चांगला पाऊस असला तरीही ऑगस्टमध्ये मात्र हवा तसा पाऊस दिसत नाहीय. गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पावसाअभावी खरिपाच्या पिकांनी माना खाली टाकल्या आहे. आता मान्सून कधी परतणार, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्व राजस्थानमधून सुरु होणार आहे. 17 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रवास उशिराने म्हणजे 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होईल. लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी ही माहिती दिली आहे.
परतीच्या प्रवासाची तारीख बदलली
दहा वर्षांपूर्वी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख एक सप्टेंबर होती. परंतु आता मान्सून लहरी बनला आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख बदलत आहे. मागील वर्षी 20 सप्टेंबर रोजी राजस्थानातून परतीचा पाऊस निघाला होता तर 20 ऑक्टोबर रोजी राज्यातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
दरम्यान, ऑगस्टपर्यंत देशातील अनेक भागात पावसाची तूट निर्माण झाली आहे. पूर्वोत्तर भारतात 17 टक्के कमी पाऊस झाला आहे. पश्चिम भारतात 8 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात पावसाची तूट 6 टक्के आहे. दक्षिण भारतात 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. एकंदरीत देशात 7 टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे आता पावसाची सर्व आशा सप्टेंबर महिन्यावर आहे. या महिन्यात दमदार पाऊस झाल्यास नदी, नाले भरणार आहे.
Discussion about this post