जालना: जालन्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील ३० वर्षीय शारदा शरद घनघाव, ४ वर्षीय दर्शना शरद घनघाव आणि अवघ्या दीड वर्षांच्या हर्षता शरद घनघाव यांचे पाण्यावर तरंगणारे मृतदेह पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला.
शनिवारी सकाळपासून डोंगरगावातील लाईट गेलेली होती. त्यामुळे काय बिघाड झाला याचा शोध घेण्यासाठी गावातील विष्णू साहेबराव घनघान हे लाईनमन आणि काही ग्रामस्थांसोबत गावाकडील विद्युत ट्रॉन्सफार्मरकडे जात होते. त्यावेळी या सर्वांना गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या सर्वांनी जवळ जाऊन पाहिले असता एकूण ३ मृतदेह दिसून आल्याने ताबडतोब ही बातमी बदनापूर पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, उपनिरीक्षक शेळके हे त्यांच्या पथकासमावेत घटनास्थळी पोहचले.
या प्रकरणी विष्णू घनघाव यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर रात्री उशिरा आसरखेडा येथील मयत शारदा घनघाव यांच्या माहेरची नातेवाईक मंडळी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर आपल्या मुलींसह नातींचा घातपात झाला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
Discussion about this post