भुसावळ । सावदा येथील कुंभारवाड्यातील चार मित्र शिरसाळा मारोती, ता.बोदवड येथे दर्शनासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातच दोघा तरुणांच्या दुचाकीला वरणगावजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला तर या अपघातात सुदैवाने दोघे बचावले. भास्कर पांडुरंग कुंभार (18) व लखन पंकज कुंभार (18, इंदिरा गांधी चौक, सावदा) अशी मयत तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे घटना?
सावदा येथील तरुणांचा दर शनिवारी शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी नित्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे शिरसाळा मारोतीच्या दर्शनासाठी चौघे मित्र दुचाकीवरून सावदा येथून निघाले होते मात्र वरणगावजवळ बोहर्डी फाट्यावर भास्कर कुंभार व लखन कुंभार यांच्या दुचाकी (एम.एच.19 डी.एम.8789) ला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने भास्कर कुंभारचा जागीच मृत्यू झाला तर लखन यास अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील खाजगी रुग्णालयात हलवले असता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघात प्रकरणी भूषण किशोर पूर्भी (18, सावदा) या तरुणाच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत.
Discussion about this post