जळगाव : राज्यभर आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी सज्ज झाली असून, उत्साहाला आता वरुणराजाचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत रात्रीपासून पावसाच्या रिमझिम सरी सुरू असून, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, धुळे, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊन-सावलीचा खेळ आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. मात्र, सध्या सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे.
या हवामान बदलामागे मध्य प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही हवामान प्रणाली सध्याच्या परिसरातच सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दहीहंडी उत्सवाच्या दिवशीच पावसाची शक्यता असल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेता उत्सव साजरा करताना आयोजकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.















Discussion about this post