नवी मुंबई । नवी मुंबईतील खारघर परिसरात मोठ्या प्रमाणावर SIR फॉर्मची अनधिकृतपणे झेरॉक्स काढली जात असल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका झेरॉक्स सेंटरमध्ये तब्बल ३,४०० SIR फॉर्म आढळून आले असून, हे फॉर्म ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पाच BLO अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी सूरज पाटील नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फॉर्म एवढ्या मोठ्या प्रमाणात झेरॉक्स करण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
नेमकी घटना कशी उघडकीस आली?
खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात मोठ्या प्रमाणावर ‘SIR’ फॉर्मची बेकायदेशीरपणे झेरॉक्स काढली जात असल्याची गुप्त माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने संबंधित दुकानावर धाव घेतली. त्यावेळी एक तरुण हे फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी घेऊन आल्याचे निदर्शनास आले. हा तरुण भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
दुकानावर ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन खारघर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले आणि दुकानातील सर्व ‘SIR’ फॉर्म जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच तो भाजप पदाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
पाच बीएलओ निलंबित; पोलिसांकडून सखोल तपास सुरू
याप्रकरणी अनधिकृतपणे शासकीय फॉर्म स्वतःजवळ बाळगणे आणि त्यांचे झेरॉक्स काढल्याप्रकरणी कारवाई करत प्रशासनाने संबंधित अकरा मतदान केंद्रांशी संबंधित पाच बीएलओ (BLO) अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलिसांनी दुकानातुन ३४०० हून अधिकृत ‘SIR’ फॉर्म जप्त केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे फॉर्म कोणाकडून आले, त्यांची झेरॉक्स काढण्यामागचा नेमका उद्देश काय होता आणि यामागे कोणाचे हात आहेत, या सर्व बाजूंचा सखोल तपास आता खारघर पोलिसांकडून सुरू आहे. या हायव्होल्टेज प्रकरणाने खारघरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.















Discussion about this post