शिक्षक होणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने शिक्षक भरतीचा निर्णय घेतला आहे. एकूण 484 कंत्राटी शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला याबाबत सीईओ डॉक्टर मैनाक घोष यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश जारी केला आहे.
डॉक्टर मैनाक घोष यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म योजनेतून प्राथमिक शिक्षणाची 414 आणि मुख्याध्यापक शिक्षकांची 70 अशी 484 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही तात्पुरत्या स्वरूपातील भरती करणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या माध्यमामधून भरती होणाऱ्या स्वयंसेवक शिक्षकांचा केवळ 2023-2024 या सत्रांमध्ये 89 दिवसांची नियुक्ती दिली जाईल. आणि याशिवाय नव्या कायमस्वरुपी शिक्षकांची नियुक्ती झाल्यावर या स्वयंसेवकांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाकडून कायमस्वरुपी भरतीची टाळाटाळ करण्यात आली असून कमी मानधनावर उच्च पात्र असलेल्या कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते असे बेरोजगारांतून संताप व्यक्त केला जातोय. तसेच कंत्राटीवर भरती केल्या जाणाऱ्या उमेदवारांकडे संपूर्ण व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता असावी, तसेच प्राथमिकच्या पदांसाठी टीईटी ही परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती पगार मिळेल?
अशी अट घालण्यात आली असली तरी या उच्च शिक्षित उमेदवारांना केवळ 7 हजार 500 रुपयांचे मासिक मानधन दिले जाईल. त्यातच स्वयंसेवक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती कधीही रद्द होऊ शकते अशा अनुषंगाने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरही सही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच जिल्ह्यात अतिरिक्त जागा असताना केवळ 484 जागाच कंत्राटावर का भरल्या जात आहेत असाही सवाल बेरोजगाऱ्यांनी उपस्थित केलेला दिसतोय. खरेच विद्यार्थ्यांचे हित जपायचे असेल तर जवळपास दिड हजार असलेल्या रिक्त जागा भराव्या, अशी मागणी होत आहेत.