जळगाव । जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बायपासच्या डांबरीकरणाच्या कामावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला असून, टायर गेलेल्या ठिकाणी चाऱ्या पडल्याचेही त्यांनी सांगितले.
पाळधी-तरसोद बायपासवरील रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले डांबरही नकली असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. पुलालगत माती धसल्याने आणि रस्त्यावर मोठ्या चाऱ्या पडल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील काही दिवसांत या रस्त्यावरील अपघातांमध्ये दोन-तीन तरुणांचा जीव गेल्याचा दावाही त्यांनी केला.
‘दोषी कंत्राटदाराला जेलमध्ये टाका’
रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “या कामाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषी कंत्राटदाराला थेट जेलमध्ये टाकले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी कारवाईची मागणी केली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलालगत असलेल्या बायपास महामार्गाचा काही भाग दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला होता. त्यामुळे प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर काही दिवस एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र रस्त्याची स्थिती लक्षात घेता पुन्हा वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे कामही सध्या सुरू आहे. या कामाच्या गुणवत्तेवर संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कामात अनियमितता किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
पाळधी-तरसोद बायपासच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post