मुंबई । देशासह राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आलीय. १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईमधील चेंबूरमध्ये घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय पीडित मुलगा आणि २० वर्षीय आरोपी तरुणी एकाच परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
इतकंच नाही, तर त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार देखील केले. दरम्यान, महिनाभरापूर्वी मुलगा आणि तरुणी दोघेही गायब झाले होते. याबाबत मुलाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दोघांचाही शोध घेत होते.
दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन चेक केले असता, ते चेन्नईमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांचं एक पथक चेन्नईला रवाना झालं. तेथून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post