नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्षपदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास आईदास पावरा यांची निवड करण्यात आली. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पावरा यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला.
रामदास पावरा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. गणेशभाऊ गवळी यांनी त्यांची प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड केली.
नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, आदिवासी समाजातील पदाधिकारी तसेच पारंपरिक वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव, महिला आणि युवक उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या हक्क, विकास आणि विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ही आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी देशभरात कार्यरत असलेली संघटना आहे. आदिवासी समाजातील विविध प्रश्न शासनदरबारी मांडणे, युवकांना संघटित करणे आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास पावरा म्हणाले, “परिषदेने सोपविलेली ही जबाबदारी स्वीकारून तळागाळातील आदिवासी तरुण-तरुणींच्या प्रश्नांसाठी तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.” त्यांच्या निवडीबद्दल चोपडा परिसरातून तसेच आदिवासी समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.















Discussion about this post