जळगाव/मुंबई : मागील महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाले आहे. तसेच शरद पवारांनीसुद्धा आपल्याला साथ द्यावी यासाठी ते प्रयत्न करीत असले तरी त्यांना अद्याप यश आले नाही. मात्र, असे जरी असले तरी दुसरीकडे शरद पवार गटाने आगामी 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यभरातील जिल्हा प्रभारी यांच्या नावाची घोषणा केली.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
वाचा कोणाकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी
राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमधील जिल्हा प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, राजेश टोपे यांच्याकडे छ.संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिव तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाण्यासह बीडची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक, अहमदनगर, अशोक पवार यांच्याकडे पुणे, रोहित पवार यांच्याकडे रायगड, भंडारा, गोंदिया आणि सुनिल भुसारा यांच्याकडे पालघर, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शरद पवार गटाची ‘एकनिष्ठतेची मोहीम’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी संधान साधत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार यांच्या गटाला गळती लागली आहे. ही गळती रोखून पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकनिष्ठतेची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्यावर असलेला विश्वास स्पष्ट होणार आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सदस्याला 7030120012 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. हा मिस्ड कॉल दिल्यानंतर सदस्याला त्याच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे एक लिंक प्राप्त होईल. या लिंकच्या माध्यमातून सदस्याला स्वतःची वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. माहिती नोंदवल्यानंतर सदर सदस्याची नोंद होऊन सदस्याचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड होईल. अशी ही एकनिष्ठतेची मोहीम गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी दिली.